चिंतेच्या मुळापाशी /At the Root of Anxiety.


Posted October 3, 2026 by vijaygaikawad

You came into my life and made me realize that even when some things arrive late, their true value can be understood the very moment they do.

 
चिंतेच्या मुळापाशी /At the Root of Anxiety.

Posted onSeptember 17, 2026 | Posted on vijay gaikwad
Spread the love
चिंतेच्या मुळापाशी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये पुरुष वैद्यकीय वार्डमध्ये त्यांची संख्या भरपूर असणे, त्यांना भरपूर संख्येने अ‍ॅडमिट करणे नवल नाही. काही खुट्ट झाले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणणे प्राधान्यक्रमाचे असणारच. उपलब्ध मनुष्यबळ आणि पैसा त्यांच्यावरच खर्च होणार, हे ओघाने आलेच.

चिंतेच्या मुळापाशी पाहिले तर असे दिसते की पुरुष एक-दोन दिवस दवाखान्यात राहतील. त्यापेक्षा जास्त नाही. पण स्त्रिया मात्र अ‍ॅडमिट केल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत दवाखान्यातच राहून सेवाशुश्रूषा करताना दिसतात.
रुग्णसेवेतील स्त्रियांची अदृश्य भूमिका
यानिमित्ताने आणखी काही गोष्टी नोंदवता येतील. आजारी पुरुषांच्या सेवाशुश्रूषेला पुरुष माणसांची संख्या नगण्य. पण महिलांची संख्या मात्र लक्षणीय. पेशंटला धरणे, उचलणे, फिरविणे ही कामे पुरुष नातेवाईक करताना दिसतात. घास भरवणे, जखमांना मलम लावणे, ड्रेसिंग करणे, अंग चोळणे, हॉस्पिटलमध्ये स्वयंपाक करणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे बघणे, रुग्णाचा आजार, त्यातील घडामोडी नातेवाईकांना कथन करणे, रुग्णांना सोबत करणे आदी कामे स्त्रियाच करताना दिसतात. त्याबाबत त्या कंटाळा किंवा टाळाटाळ कधीच करत नाहीत, मीच ‘ती’ कामे करते असा डांगोराही पिटत नाहीत. ही कामे घाण आहेत, त्यापासून दूर राहावे असे त्यांच्या मनाला वाटत नाही, पटतही नाही. उलट ‘अशी सेवा’ करणे हे आपले कर्तव्य आहे व त्यातच पुण्य आहे अशीच त्यांची भावना असते.

मूल असेल तर आई, नवरा रुग्ण असेल तर त्याची बायको किंवा आई वा बहीण, सासरा असेल तर सासू किंवा सून नावाच्या नात्याची बाईच सेवेला असते. या सेवा ताफ्यात लेक, बहीण नावाची स्त्रीही सामील असतेच.

चिंतेच्या मुळापाशी असे दिसते की पुरुष एक-दोन दिवस दवाखान्यात राहतील. त्यापेक्षा जास्त नाही. पण स्त्रिया मात्र अ‍ॅडमिट केल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत दवाखान्यातच राहून सेवाशुश्रूषा करताना दिसतात.

बरे, मेल मेडिकल वार्डमध्ये स्त्रियांसाठी काही वेगळ्या सुविधा असतात, असेही नाही. मासिक पाळीच्या वेळी वार्डात काय हालत होत असेल तिची. बाथरूम, संडास, चेंजिंग रूम काहीच वेगळे नसते. पुरुष जे संडास-बाथरूम वापरतील तेच स्त्रियांना वापरावे लागते. रात्री-अपरात्री याठिकाणी विनयभंग व बलात्काराच्या तुरळक घटना घडतात. त्याशिवाय सतत भीतीच्या असुरक्षिततेच्या वातावरणात राहणे, तिथेच साडी वगैरे बदलणे, कंगवाफणी करणे. लज्जा येईल; असुरक्षित वाटेल असेच आजूबाजूचे वातावरण. त्याचा एक विलक्षण ताण असतोच. अंघोळपाणी, सकाळचे प्रातर्विधी त्यांना सार्वजनिक जागी, अंधाऱ्या जागी शक्यतो रात्री करावे लागतात. थोडा विचार करा परक्या पुरुषांचा जिथे दिवसरात्र वावर आहे, तिथे या साऱ्या गोष्टी करताना स्त्रियांना कसे होत असेल? प्रसंगी काय काय दिव्यातून जावे लागत असेल?

विचार केला तर सकाळचा स्वतःचा प्रातर्विधी, अंघोळपाणी, वेणीफणी, जेवणाखाण्याची तयारी, रुग्णाची स्वच्छता, देखभाल यासाठी लवकर उठावेच लागते. पेशंटच्या बेडजवळच झोपावे लागते. जनरल वार्डात रात्री पेशंट येतात. इतर रुग्ण मध्येच सिरिअस होतात. सारा वार्ड जागाच असतो. अशा वातावरणात झोप घेणे, किती झोप मिळणार?

सर्व काम करून झाल्यावर थोडे अन्न स्वतःच्या पोटात ढकलणे. अन्न थोडेच जाते. त्यातच स्वभावाने त्या भावनाशील. आपला नातेवाईक गंभीर आजारी आहे. त्याने काहीच अन्न खाल्ले नाही, थोडेच खाल्लेय. मग त्याही आपली तहान-भूक चहा-कॉफी किंवा पाण्यावरच भागवतात. त्यामुळे दवाखान्यातच त्या आजारी पडतात. दवाखान्यात असूनही तेथील वैद्यकीय सुविधांचा वापर त्या स्वतःसाठी कमी प्रमाणात करताना दिसतात.

‘ह्यांचे अगोदर होऊ दे. मग माझे बघू’

असे वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. एखादी पित्ताची Gelucil, Rantac किंवा तापाची Crocin वगैरे गोळी मागून त्या आपले आजारपण आटोपते घेतात. दुधाची तहान पाण्यावर भागवल्यासारखे, असो.

चिंतेच्या मुळापाशी – पुरुष, त्यांचे आजार आणि हॉस्पिटलमधला स्टे
पुरुष, त्यांचे आजार आणि हॉस्पिटलमधला ‘स्टे’

आता पुरुष, त्यांचे आजार, त्यांचा खर्च, हॉस्पिटलमधला त्यांचा ‘स्टे’ याबाबत घोडे. पुरुषांमध्ये व्यसनाधीनता अधिक आहे हे लक्षात येते. दारू पिणे हे त्यातले सर्वाधिक व्यसन, त्यामुळे दारूच्या अतिरेकाने कोमात जाणे, झटके येणे, दारूबरोबर इतर व्यसने करणे (उदा. अफू, गांजा) त्यांच्या आत्यंतिक सेवनामुळेही बेशुद्ध पडणे, झटके येणे. त्यातच मृत्यू येणे असले प्रकार घडतात. दारूच्या नशेत बाहेरख्यालीपणा वाढतो. वेश्यागमन असते. त्यामुळे गनोरिया, एड्ससारखे आजार होतात. दारूच्या नशेत अपघाताच्या घटना घडतात. स्वतःच्या जीवाबरोबर दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे फ्रॅक्चर होणे, विविध अवयवांना इजा पोहोचून रक्तस्राव होणे; मेंदू, मज्जारज्जू, मणके यांना गंभीर आजार होऊन पॅरालिसिस होणे, शुद्ध हरपणे; मेंदूत रक्तस्राव होऊन कोमात जाणे, हातपाय लोळागोळा होणे या गोष्टी घडतात.

व्यसनांमुळे मानसिक आजार जडतात. अस्वस्थपणा, नैराश्य, संशयी स्वभाव, समाजविघातक वागणूक यामुळे शत्रुत्व वाढते. प्रचंड अस्वस्थलेपण व नैराश्य यामुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात बळावतात. त्यासाठीचे मार्ग शोधले जातात. त्यात गळफास लावून घेण्यापासून विविध विषांचे प्राशन करण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे मेल वार्डामध्ये वारेमाप दारू पिलेले, विष पिऊन पडलेले, गळफास लावून घेतलेले, अपघात करून घेतलेले, इतर औषधांचा वापर करून आत्महत्येचा प्रयत्न केलेले लोक अ‍ॅडमिट होतात. दारूचा दुष्परिणाम होऊन कावीळ होणे, लिव्हर खराब होणे, रक्तस्राव होणे, लकवा मारणे, हृदयरोग यांचे प्रमाण वाढते.

दारूच्या व्यापारातून शासनाला कर मिळतो. तीच दारू लोक पितात; आजारी होऊन शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. सरकारला त्यांच्या औषधोपचारावर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. लोकांच्या, सरकारच्या पैशाचा असा चुराडा होतो.

याच दारूमुळे गुन्हेगारी, वेश्यागमन आदी गोष्टी आल्याच. लिंगविषयक आजार आलेच.

दारूच्या व्यसनाखालोखाल तंबाखूचे व्यसन सर्वाधिक आहे. तंबाखूमुळे हृदयरोग, रक्तदाब, लकवा मारणे, फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर आदी रोग होतात. याही आजारावर शासन, समाज यांचाच पैसा वाया जातो.

तरुणपिढी यात बरबाद होते ही त्यातली घातक बाब होय. रोगट (शारीरिक, मानसिक) तरुण पिढी देशाच्या विकासात काय भर घालेल?

आता खर्चाविषयी

दिसून येते की, मुलींपेक्षा मुलांना, स्त्रियांपेक्षा पुरुषांना रोगाच्या निदान-उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तत्परतेने अ‍ॅडमिट केले जाते. पुरुषांना अ‍ॅडमिट करा म्हटले की तुलनेने जास्त लवकर होकार दिला जातो. मुलांना लवकर अ‍ॅडमिट केले जाते. त्यामानाने मुलींना, स्त्रियांना गंभीर अवस्था झाल्याशिवाय अ‍ॅडमिट केले जात नाही. पुरुष रुग्णांच्या पटपट तपासण्या केल्या जातात. महागड्या तपासण्या करतानाही फारशी खळखळ केली जात नाही. प्रसंगी कर्ज काढले जाते. पण उपचार केला जातो.

हॉस्पिटल स्टे

हॉस्पिटल स्टेबाबतः पुरुषांचा हॉस्पिटल स्टे (राहण्याचा काळ) भरपूर दिवस असला तर सहन केला जातो. लवकर डिस्चार्ज द्या म्हणून विनंती केली जात नाही, तशी कटकट नसते. ट्रीटमेंट ऑप्शनबाबत पर्याय विचारले जात नाहीत. कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटबाबत ताबडतोब होकार दिला जातो.

पुरुष रुग्ण महिनोन्महिने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट राहिले तरी चालतात. यामागे Gender bias आहेच. त्याचबरोबर आणखी एका दुर्लक्षित बाबीकडे मला लक्ष वेधायचे आहे. रुग्ण सेवेसाठी गरज असते हॉस्पिटलमध्ये राहू शकणाऱ्या व्यक्तीची. पडेल ते काम करू शकेल, भावनिक ताण सहन करूनही सेवा देऊ शकेल अशी व्यक्ती. प्रत्येक घरात कुणी ना कुणी तरी अशी एखादी ‘उपयुक्त’, ‘शहीद’ स्त्री असतेच. तिचा होकार असो वा नसो; इच्छा असो वा नसो तिला या गोष्टीसाठी अपॉईंट केले जातेच. स्वतःचाच नैतिक दबाव, पुरुषी दबाव, स्त्री संस्कारांतून आलेली सेवाभावी वृत्ती, तसली भावनिक गुंतणूक यामुळे स्त्रिया हॉस्पिटलमध्ये रहावयास लवकर तयार होतात. मुळातली सोशीकवृत्ती (पारंपरिक स्त्री संस्कारातून आलेली), त्यागीवृत्ती सोबतीला असतेच. हॉस्पिटलच्या रोगट, अस्वच्छ, अस्वस्थ, असुरक्षित, गैरसोयीच्या वातावरणात स्त्रियांनाच ढकलले जाते; बळी दिले जाते. प्रत्येक कुटुंबात अशी आजारपणातील सेवाशुश्रूषेसाठी एखादी स्त्री ‘अलॉट’ केलेली असतेच. रिझर्व्ह फिमेल फोर्स!

पुरुषी मानसिकता आणि आरोग्य

पुरुषांमध्ये नैसर्गिक आजारापेक्षा ‘मॅन मेड’ आजार भरपूर आहेत हे पुन्हा अधोरेखित होते. व्यसनाधीनता, बाहेरख्यालीपणा, तथाकथित ‘पुरुषी’पणाच्या नावाखाली हाय रिस्क बिहेविअरमुळे अपघात व लैंगिक आजार यांचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे.

भावनिक बुद्ध्यंक उच्छृंखलतेकडे झुकणारा असल्यामुळे भावनिक आंदोलनात अप्स अँड डाऊन्स भरपूर असतात. पुरुषी आकांक्षेचे संस्कारित बाळकडू, प्रत्येक पातळीवर पुरुष म्हणून प्राधान्य, लाड, चोचले यांची बरसात यामुळे बेधडकपणा, आक्रमकता, अपघाती वृत्ती; त्यातून येणारे अस्वस्थलेपण, नैराश्य यांना पुरुषी वृत्ती बळी पडते. त्यातूनच व्यसनाधीनता वाढते. मानसिक, शारीरिक रोगटपणा वाढतो. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते. आत्महत्येचे मार्ग चोखाळले जातात.

आत्महत्या करण्याचे मार्गही ‘पुरुषीच’ असतात. चालत्या वाहनाखाली वा धावत्या रेल्वेखाली उडी घेणे, गळफास लावून घेणे, नदीत-विहिरीत उडी मारून आत्महत्या करणे. त्याखालोखाल विष पिणे (शेतकरी असेल तर कीटकनाशक घेऊन), झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन, दारूचे अतिरेकी सेवन याद्वारे मृत्यूला कवटाळले जाते.

मुलगा आणि मुलगी : वेगवेगळे मापदंड

भारतीय आईवडील पुरुष लिंगालाच महत्त्व देत असल्यामुळे घरात मुलगा व मुलगी यांच्याबाबत कायम वेगवेगळे मापदंड असतात. मुलांचे भरपूर लाड, साधनांची तत्पर देवाणघेवाण, चुकांवर पांघरूण असले प्रकार असतात. ‘मर्दानगी’चे संस्कार वडील, चुलते, आजोबा यांच्याकडून कळत-नकळत मिळतच असतात.

‘मुलीसारखा काय रडतोस? तू काय बांगड्या भरलायस काय? अंगात नॅट असंल तर करून दाव’ असले ‘मर्दानगी’ जागवणारे संस्कार पदोपदी मिळत असतात. मुलाने काही ‘मर्दानगी’च्या चुका केल्याच तर त्याकडे एकतर कानाडोळा केला जातो किंवा सौम्य शिक्षा देऊन, जुजबी समज देऊन प्रकरण मिटविले जाते. काही वेळा अप्रत्यक्षपणे सदर गोष्टींना प्रोत्साहनही दिले जाते.

तर वरील ‘मॅनमेड’ आजारांबरोबर हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर (तंबाखू, विडी), पोटाचे, यकृताचे विकार, कॅन्सर (दारू), आतड्याचे, मुखाचे कॅन्सर (तंबाखू, दारू), लिंगविषयक आजार हेही पुरुषांमध्ये आहेतच.

चिंतेच्या मुळापाशी जाऊन विचार केला तर आपण पुरुषी मानसिकतेचे संवर्धन करतोय. त्यातून अनेक ‘मेल जेंडर स्पेसिफिक’ आजारांना आमंत्रण देतोय, हे कधी कळणार आम्हांला?

मूळ लेखक: डॉ. रवींद्र श्रावस्ती

मूळ पुस्तक: आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल

प्रकाशक: नाग-नालंदा प्रकाशन

प्रकाशक: त्र्यंबकेश्वर मिरजकर

भाग समाप्त — चिंतेच्या मुळापाशी
 
Contact Email [email protected]
Issued By vijay gaikwad
Business Address top kolhapur maharashtra
Country Trinidad and Tobago
Categories Books , Education , Science
Last Updated October 3, 2026